Thursday, December 4, 2014

शोभा भागवत -- ती -- माझी मुलगी--लग्न होऊन गेली

ती -- माझी मुलगी--लग्न होऊन गेली
घरातली सारी किलबिल बरोबर घेऊन गेली.
माझ्या डोळ्यांपुढची सगळी वाट धुकं धुकं झाली.

तिची मांजरी, तिची पुस्तकं,तिची वाद्यं, तिची घुंगरं
लाडके कपडे आणि पत्रं, तिचे फोटो, तिची चित्रं
कुणी गात नाही, कुणी हसत नाही
सगळ्यांना जाताना ती स्टॅच्यू म्हणून गेली
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली.

इवली असल्यापासून इथं तिचच राज्य होतं.
जरा कुठं गेली कि घर कावरं बावरं होत होतं.
तिचं बोलणं, तिचं हसणं, रागानं कधी तणतण करणं,
तिचं गाणं, तिचं हसणं, मनापासून चित्र काढणं,
तिच्यामुळे आमच्या घरची मैफल रंगत गेली
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली.

आमच्या गप्पा, आमची गुपितं,आमचा स्वयंपाक, बाहेर जाणं,
आमच्या टिंगली, आमची भांडणं,चिडवाचिडवी, खरेद्या करणं,
स्वप्नं,चिंता,वैताग सांगणं, एकमेकींना घडवत रहाणं,
पोकळी होणं म्हणजे काय याची समज आली
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली.

बावीस वर्षं मुलगी आपल्याला किती काय काय देते
वाढत्या वयांत किती गोष्टी प्रेमाने शिकवत रहाते
माया देते, धीर देते, आपल्यासाठी तीच कळवळते.
ओझं कसलं, फुलपांखरू ते याची जाण झाली.
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली.

तिच्या माझ्या धाग्यांचं एक नातं विणलं आहे.
तिचे वेगळे, माझे वेगळे रंग घेणार आहे.
नवं नातं विणण्यांत ती आता गुंतली आहे.
त्याचे रंग सुंदर वेगळे मला कळतं आहे.
एकमेकांना दुर्मिळ झालो याची जाणीव झाली
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली.

Wednesday, January 15, 2014

नामदेव ढसाळ : आई



आई गेली याचं दुःख नाही
प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते
दुःख याचं आहे,
की अज्ञानाच्या घोषा आत
तिने आयुष्याच्या वाटाघाटी केल्या
गाव सोडताना ती तिथेच ठेऊन आली
मरीआईचा गाडा
विस्थापित होऊन बाप आगोदरच
धडकला होता शहरात
आई शहरात आली देहाचं झाडवान घेऊन
कष्ट, खस्ता उपसल्या भोगल्या तिने
तरीही तिचा अद्भुताचा शोध चालूच होता
तिच्या देहातली वाद्य अशी झंकारत रहायची
बाप तसा खाटीकखान्यातला कसाईच होता
प्रत्येक रात्री जनावरांचे सोललेले देह वहायचा
रक्तबंबाळ व्हायचा
चिक्कार पाहिलं भोगलं आईनेही
शहरातही तिने तवली मध्ये अन्न शिजवलं
पैठणीचे रंग न्याहाळता न्याहाळता
जुनेराला ठिगळ लावलं
बापाआधी मरून तिने असं अहेवपण जिंकलं
बाप अजूनही खुरडत खुरडत मरणाची वाट पाहतो आहे
आई आगोदर बाप मेला असता,
तरी मला त्याचं काही वाटलं नसतं
दुःख याचं आहे,
तोही तिच्या करारात सामील होता
दोघांनीही दारिद्र्याचे पाय झाकले
लक्ष्मी पूजनाला दारिद्र्य पूजलं
प्रत्येक दिवाळी ही माझ्यासाठी अशी एक एक पणती विझवत गेली
स्वतःच्या छोट्या विश्वाचा उलगडा झाला नाही आईला
आभाळाकडे हात करून ती म्हणायची,
त्याच्याशिवाय साधं झाडाचं पानही हलत नाही...
आईच्या नातवाला पृथ्वीचा आकार तरी कळला आहे...
विजा का चमकतात? पाउस का पडतो?
तो सांगू पहायचा आजीला,
माझ्या येडपटा,
म्हणत ती त्याच्या पाठीत धपाटा टाकायची
बाबा नियंत्याची अशी चेष्टा करू नये म्हणायची,
तिला हे जग, गैबान्याची शाळा वाटायची
ती म्हणायची,
पृथ्वी म्हणजे त्याने अंथरलेली लांब चादर आहे
तिला आदी नाही अंत नाही...
उन - सावली सर्व त्याच्या इच्छेचाच खेळ म्हणायची
आई मेली याचं दुःख नाही
प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते