Saturday, August 28, 2010

बा. भ. बोरकर - दिसली नसतीस तर

रतनअबोलीची वेणी माळलेली
आणि निळ्याजांभळ्या वस्रालंकारात
संध्येसारखी बहरलेली तू
तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात
आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस
तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर
हा भुलावणा सप्तरंगी सोहळा
असा सर्वांगानी फुलारलाच नसता 

आपल्याच नादात तू
पाठ फिरवून परत जाताना
तुझी पैंजणपावले जीवघेण्या लयीत
तशी पडत राहिली नसती
तर माझ्या आनंदविभोर शब्दातून
कातरवेळची कातरता
आज अशी झिणझिणत राहिलीच नसती 

अबोलकेपणाच्या गूढ गाढाईने
जाईजुईच्या सांद्र-मंद्र सुगंधाचा लळा
सहज चुकार स्पर्शाने तू मला लावला नसतास
तर उमलत्या फुलपाखरांची
आणि मुक्या भाबड्या जनावरांची
आर्जवी हळुवार भाषा
इतक्या स्पष्टपणाने मला कळलीच नसती 

तू कशामुळे माझी जिवलग झालीस
ते खरेच मला आता आठवत नाही;
पण मला तोडताना
समुद्रकाठच्या सुरुच्या बनात
मिट्ट काळोखातून चंद्रकोर उगवेपर्यंत
तू मुसमुसत राहिलीस
हे मात्र मी अजून विसरु शकलेलो नाही
त्या वेळची तुझी ती आसवे
अजून माझ्या कंठाशी तुडुंबलेली आहेत
तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस
तर माझ्या शृंगाराचा अशोक
आज करुणेच्या आरक्त फुलांनी
असा डवरलाच नसता 

तू तेव्हा आकाशाएवढी विशाल
आणि अवसेच्या गर्भासारखी दारुण
निराशा मला देऊन गेली नसतीस
तर स्वतःच्याच जीवन शोकांतिकेचा
मनमुराद रस चाखून
निःसंग अवधूतासारखा
मी या मध्यरात्रीच्या चांदण्यात
असा हिंडत राहिलोच नसतो 

तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीसः
माझी सशरीर नियती होतीस
तसे नसते तर आज जो काय मी झालो आहे
तो झालोच नसतो 

Monday, August 23, 2010

अरुणा ढेरे : देता यावे...

देता यावे हसू
निरभ्र अकलंकित
निरागस तान्ह्याच्या आनंदाइतके सहज कोवळे

देता यावे हात
निर्हेतुक आश्वासक
स्वत:ला स्वत:चा आधार देण्याइतके स्वाभाविक मोकळे

देता यावे शब्द
अम्लान निःसंशय
आयुष्याच्या पायाशी जगणारे निरहंकार

देता यावे हृदय
अपार निरामय
दयाघनाच्या दारापाशी पोचवणारे निराकार

Monday, August 16, 2010

नारायण सुर्वे: विझता विझता स्वत:ला....


झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते
अशी आमंत्रणे आम्हांलाही आली; नाहीच असे नाही।

असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून
शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असेही नाही।

शास्त्र्याने दडवावा अर्थ आम्ही फक्त टाळच कुटावे
आयुष्याचा अनुवादच करा सांगणारे खूप; नाहीत असे नाही।

असे इमान विकत घेणारी दुकाने पाड्यापाड्यावर
डोकी गहाण ठेवणारे महाभाग नाहीत असेही नाही।

अशा बेइमान उजेडात एक वात जपून नेताना
विझता विझता स्वत्:ला सावारलेच नाही, असेही नाही।

Saturday, August 14, 2010

इंदिरा संत : मरवा

पुस्तकातील खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे;
पिसाहुनि सुकुमार काहिसे
देता घेता त्यात थरारे.

मेजावरचे वजन छानसे
म्हणून दिला नाजूक शिंपला;
देता घेता उमटे काही
मिना तयाचा त्यावर जडला

असेच काही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा
देता घेता त्यात मिसळला
गंध मनातिल त्याहून हिरवा.

Friday, August 6, 2010

अरुणा ढेरे : यक्षरात्र

पाण्यासारखेच, वाहते सदाचे
आयुष्य नावाचे, खुळे गाणे

किनारे धरुन, अखंड चालला
दुःखांचा काफिला, मस्तपणे

सुखाचेही तळ, जाताना घासून
अस्तित्वाची खूण, कळे मला

दिव्यापरी आता, प्राक्तन जोडून
प्रवाही सोडून, श्‍वास दिला

आणि रंगगर्द, क्षितिज पेटले
रात्री उजाडले, क्षणमात्र

तमाने टाकली प्रकाशाची कात
झाली काळजात, यक्षरात्र !

Wednesday, August 4, 2010

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती, करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी, नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली, निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"

- कुसुमाग्रज

Monday, August 2, 2010

आकाश उजळले होते

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

सुरेश भट